छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः घाटी रुग्णालयात शास्रक्रियेसाठी आलेल्या पुरुष वॉर्डात रुग्णांना रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. रुग्णालयात कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाकडून रुग्णांची पर्यायी व्यवस्था करण्याचा नुसताच कांगावा करण्यात येत होता, मात्र प्रत्यक्षात रुग्ण जमिनीवरच झोपलेले असल्याचे चित्र घाटी रुग्णालयात दिसून आले. याबाबत चौकशी केली असता कुठलीही ठोस माहिती अधिकार्यांना देता आली नाही.
मराठवाड्यातील सर्वात मोठे आणि गरिबांसाठी वरदान ठरलेल्या घाटी रुग्णालयात खान्देश आणि विदर्भातून रुग्ण मोठ्या प्रमाणात घाटी रुग्णालयात येतात. मात्र घाटीमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. काही रुग्णांना रस्त्यात झोपवल्याने त्यांना इतर रुग्णांच्या नातेवाइकांच्या ये-जा करण्याने त्रास सहन करावा लागत आहे. तर एमआरआयसाठी रुग्णांना नोंदणी केल्यानंतर एक महिन्यानंतरची तारीख दिली जात असल्याचे दिसून आले. यावरूनच घाटीतील प्रशासानचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा ऐरनीवर आला आहे.














